डॉ.सुनीलकुमार लवटे

       Home
 

संक्षिप्त परिचय

11 एप्रिल, 1950 ला जन्म. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण. एम.ए., पीएच.डी. हिंदी विषयात. प्राथमिक शिक्षण पंढरपूरमध्ये. पुढे कोल्हापूरमध्ये उर्वरित शिक्षण व जगणे.

उच्च शिक्षणासाठी गारगोटी येथील मौनी विद्यापीठात प्रवेश. तिथे परिस्थितीच्या जाणिवेने खडतर अध्ययन. भारत सरकारची शिष्यवृत्ती व महाराष्ट्र शासनाचा निर्वाह भत्ता या बळावर ग्रामीण विद्यापीठाच्या पदवी समकक्ष शिक्षण पदविकेत भारतात सर्वप्रथम. ‘रोल ऑफ ऑनर’ने भारत सरकारकडून सन्मानित.

शालेय वयात साने गुरुजींचे साहित्य, वि. स. खांडेकरांचा सहवास, थोरा-मोठ्यांची व्याख्याने, ‘आंतरभारती’ घडण यामुळे आयुष्यभर समर्पित शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्य करत निवृत्त. जीवनाच्या प्रत्येक वळणावर समरसून काम करण्याची वृत्ती. त्यामुळे प्रत्येक वेळी ‘अशक्य ते शक्य करिता सायास’चा ध्यास. हायस्कूल शिक्षक असतानाच ‘डॉक्टरेट’ मिळवून महाविद्यालयात. महाविद्यालयात पुस्तके लिहून विद्यापीठात. प्राचार्य म्हणून उपक्रमांचा उच्चांक. अशा सतत ऊर्जस्वलतेमुळे जाण्याचा अनिवार ध्यास. सन 2010 मध्ये निवृत्त.

त्यातूनच मग स्वावलंबनानंतर अनाथांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यासाठी 1980 ते 2000 अशी दोन दशके अविरत प्रयत्न. कोल्हापूरच्या ‘रिमांड होम’चे बालकल्याण संकुलमध्ये रूपांतर. महाराष्ट्र राज्य वंचित संस्थेचे अध्यक्षपद. ‘समाज सेवा’ त्रैमासिकाचे संपादन. भारतीय शिष्टमंडळातून युरोप-आशिया खंडातील 15 देशांचे अभ्यास दौरे. त्यातून महाराष्ट्रभरच्या अनाथाश्रम, रिमांड होम्ससंबंधी प्रशासन यंत्रणा विकेंद्रीकरण, योजनांचे एकत्रिकरण, संस्था दर्जा सुधारणा, बालकांचा राष्ट्रीय कायदा व हक्कासंबंधी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराचे कार्य व सन्मान. सध्या सर्व पदांचा त्याग.

हे सारे करत मराठी, हिंदीत विपुल लेखन. आत्मकथा, लेखसंग्रह, कथासंग्रह, भाषणसंग्रह, काव्यसंग्रह, यांशिवाय भाषांतर, संपादन, समीक्षात्मक लेखन. मराठी, हिंदीत 75 ग्रंथ प्रकाशित.लेखनास महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका), भाषांतर व समीक्षेस भारत सरकारचे राष्ट्रीय पुरस्कार. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी जीवन गौरव, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्काराने गौरव. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद. महाराष्ट्रात अनेक वस्तुसंग्रहालयांची निर्मिती. त्यांच्या ग्रंथांची हिंदी, गुजराती व इंग्रजीत भाषांतरे व ब्रेलमध्ये रूपांतरे. अनेक विद्यापीठीय अभ्यासक्रमांत त्यांच्या साहित्याचा समावेश व संशोधन.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जिल्हाधिकारी म्हणून तपभर कार्य. कारागृह, पोलिस चौकी सुधारणा व बंदी बांधवांना मानवाधिकार प्रदान. कोल्हापूरच्या वंचित विकास, शिक्षण, साहित्य, संस्कृती उपक्रमांची नोंद घेऊन ‘कोल्हापूर भूषण’ नागरी सन्मान.हिंदी सेवेसाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘महाराष्ट्र भारती जीवन गौरव’ पुरस्कार.पुरस्कार, लेखन, व्याख्याने, मानधन, ‘सामाजिक संकल्प निधी’ मानून सुमारे पंधरा लाख रुपयांची आजवर मिळालेली रक्कम विविध शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक संस्था व व्यक्तींना अर्पण.
 

 
       
| संक्षिप्त परिचय | विस्तृत परिचय (Bio-Data:English/Marathi) | पूर्व पदभार | कार्य | मराठी साहित्य संपदा |
हिंदी साहित्यसंपदा | सामाजिक/सांस्कृतिक/शैक्षणिक/साहित्यिक कार्य | मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद | पुरस्कार/सन्मान | प्रकाशित पुस्तके (Publications) | छायाचित्रे | संवाद ब्लॉग |
drsklawate@gmail.com